Sunday, July 10, 2016

च्यायला..... बीजगणिताचे काय कळतच नाही...

च्यायला..... बीजगणिताचे काय कळतच नाही... 
माणूस कितीही फिरला तरी पुन्हा तेथेच येतो असे म्हणतात. अगदी तसेच झाले. 1987 साली दहावीपर्यंत बीजगणिताची उदाहरणे सोडवताना वैताग यायचा. आज गुरुवारी मुलाचा 8 वी परीक्षेचा पेपर पाहून डोके पुन्हा गरगरलायला लागले. x गुणिले y बरोबर 12 तर x आणि y म्हणजे किती..... असले काही तरी भयानक प्रश्‍न असायचे. त्यावेळच्या भोवळचाच आज अनुभव आला. मुलाच्या पेपरमधील प्रश्‍न पाहून मला मुलाची दया आली. सारखे अभ्यास कर म्हणून आम्ही त्याला उगाचच रागवतो असे वाटू लागले. उगाचच मनात एक अत्यंत वाईट विचार येऊन गेला. वाटले.... आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, रामानुजन, अल्बर्ट आईस्टाईन, पायथागोरस, आयझॅक न्यूटन, व्हीलयेम लेबनिझ, लियोनार्दो पिसानो (सर्वांची माफी मागून) यासारख्यांनी गणित, बीजगणित किंवा भूमितीमधील शोध लावले नसते तर किती बरे झाले असते....!!

नियम, कायदे पाळणे सर्वांचे कर्तव्य

नियम, कायदे पाळणे
सर्वांचे कर्तव्य
वाहतूक खात्याच्यावतीने शुक्रवारी रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. पणजी आणि मडगाव शहरासह डिचोली, वाळपई, म्हापसा, वास्को, फोंडा आदी ठिकाणी पोलिसांनी ही मोहीम कडकपणे राबवली. याबद्दल वाहतूक विभागाचे कौतुक करावेच लागेल. पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या तब्बल 5 हजार 179 दुचाकीस्वारांवर कारवाई करून दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर वचक बसावा तसेच नियमांविषयी जागृती व्हावी असाच हेतू अशा मोहिमांमागे असतो, पण पोलिसांच्या कारवाईचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, गतीवर नियंत्रण न ठेवणे, मोटारींना गडद रंगाचे फिल्मिंग करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना चॉकलेट देण्याचा उपक्रम राबविला होता, पण नियम तोडण्यात धन्यता मानणारे दंड करा किंवा चॉकलेट द्या आम्ही असेच राहू असा इशारा देतात. पोलिसांनी दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली पण हेच पोलिस आलिशान कारचालकांवर कारवाई करताना दिसत नाहीत. अनेक चारचाकीचालक विशेषत: श्रीमंत वर्गातील लोक वाहतूक पोलिसांना जुमानत नाहीत. पोलिसांनी एखादेवेळेस कारवाई केल्यास पोलिसांनाच दादागिरी केली जाते. मी कोण आहे माहीत आहे का, अशा शब्दात सुनावले जाते. प्रसंगी राजकीय नेत्यांना फोनाफोनी करून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर दबाव आणला जातो. कारच्या काचांना गडद रंगाची फिल्मिंग करून सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही धुडकावले जातात. पोलिसांच्या कचखाऊ धोरणामुळे मग आम्ही वाहतुकीचे नियम का पाळावे, असा प्रश्‍न दुचाकीस्वारांच्या मनात निर्माण झाल्यास नवल नाही. आम्हाला एक आणि श्रीमंतांना एक असा न्याय का, असेही अनेकदा विचारले जाते. यावर कोणीही काही उत्तर देऊ शकत नाही. खरे तर एक जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे नव्हे सार्वजनिक ठिकाणचे सर्वच नियम आणि कायदे पाळणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. केवळ पोलिसांना जबाबदार न ठरवता सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. कारण एका चुकीमुळे केवळ आपलाच नव्हे, तर दुसऱ्यांचाही जीव धोक्‍यात घालत असतो. 
प्रसिद्धीसाठी काय पण...
एखाद्या गोष्टींची सवय लागली की, त्याचे व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. मग ते व्यसन कशाचेही असो. कुणाला कशाचे आणि कुणाला कशाचे व्यसन लागेल हे सांगता येत नाही. सध्या देशभरात अनेकांना प्रसिद्धीचे व्यसन लागले आहे. याची सुरवात दोन अडीच वर्षांपूर्वी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर झाली. अर्थात आंदोलन, धरणे, मोर्चा या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनातून थेट मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांचा आदर्श घेऊन अनेकजण आज चळवळी चालवत आहेत. जेएनयू प्रकरणातून उदयास आलेला कन्हैया आज देशभर केंद्र सरकार, भाजप आणि आरएसएसविरुद्ध भाषणे ठोकत आहे. तिकडे महाराष्ट्रात मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या तृप्ती देसाईंच्या अंगात भलतेच बळ आले आहे. कोल्हापुरची अंबाबाई, शनी शिंगणापूरचा शनी देवाचा चौथरा आणि त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात प्रवेश झाल्यावर त्या आता मुंबईतील हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी आतुर झाल्या आहेत. अशा आंदोलनांतून नेमकी कोणती समाजसेवा होते, हे कळायला मार्ग नाही. आपल्याकडेही वेगळी परिस्थिती नाही. एखाद्या घटकाने सरकाविरुद्ध आवाज उठवला रे उठवला की, सत्तेत नसलेले सगळेच तिकडे धाव घेतात. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्याने राज्यातील सगळे प्रश्‍न, समस्या आणि अडचणी आपण चुटकीसुरशी सोडवू, अशा थाटात अनेकजण पुढे येत आहेत. मग ते आम आदमी पार्टीचे लोक असोत किंवा कॉंग्रेसचे नेते. विषेशत: तरुणांमधील रक्‍त प्रमाणापेक्षा जास्तच सळसळत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा मूळ समस्या बाजूलाच पडते आणि किंवा तशीच राहते मात्र आंदोलन आणि त्यावरील राजकारण सुरूच राहते. मग पेडण्यापासून काणकोणपर्यंत सर्वच ठिकाणी हे प्रसिद्धीपिपासू लोक पोहोचतात आणि सरकारविरुद्ध शड्डू ठोकतात. या लोकांना कोणताही विषय वर्ज्य नसतो. प्रश्‍न कोणताही असो अगदी किंवा समस्या असो, हे लोक शक्‍तिमान किंवा बालवीरसारखे धावून येतात आणि लोकांना दिलासा देतात. आपण करत असलेल्या प्रत्येक आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमांनी घ्यावी, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. फेसबूक, ट्विटर यांचाही हे लोक लीलया वापर करताना दिसतात. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी येऊन गेले की, मग अशा आंदोलनाचे काय पुढे जे व्हायचे तेच होते. कन्हैया किंवा तृप्ती काय अनेकांचे असेच सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांत 24 तास झळकणारे केजरीवाल आज कुठे आहेत, याचाही बोध या लोकांनी घ्यायला हवा.
अशोक ढेरेकर

तुमचे काम झालेले नाही... दोन दिवसांनी फोन करा

तुमचे काम झालेले नाही... दोन दिवसांनी फोन करा
पणजीतील माहितीघरांत सावळा गोंधळ : समन्वय आणि माहितीचा अभाव

पणजी, ता. 19 : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. या म्हणीची प्रचिती पणजीतील माहिती घरांमध्ये नागरिकांना येत आहे. नागरिकांना झटपट दाखले मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि कदंब बस स्थानक परिसरात माहिती घरांची स्थापना करण्यात आली. मात्र सात चौदाचा उतारा वगळता अन्य कोणतेही काम दिरंगाईने होत असल्याचा नागरिकांचा रोजचा अनुभव आहे.
सात चौदाचा उतारा, म्युटिशेन, जन्म - मृत्यू दाखले, खातेफोड, सर्व्हे प्लॅन आदी दाखले आणि नकाशे देण्याचे काम या माहिती घरातून होते. अर्ज केल्यानंतर संबंधित दाखला किंवा प्लॅन कधी मिळेल हे न सांगता दोन दिवसांनी फोन करा, एवढेच सांगितले जाते. नागरिकांनी याठिकाणी फोन केल्यानंतर पावती क्रमांक विचारला जातो. मग अजून आपले काम झालेले नाही. दोन दिवसांनी फोन करा, एवढेच सांगितले जाते. हे दोन दिवस कधीच संपत नाहीत, असा अनुभव नागरिकांना येत आहे.
सीआरझेडच्या 200 आणि 500 मीटर रेषा दाखवणारा सर्व्हे प्लॅनसाठी अर्ज केलेल्या एका नागरिकास तब्बल 22 दिवसांनंतर तुम्हाला अर्जंट असेल तर पैसे परत न्या... असा अनाहूत सल्ला या माहिती घरातून दिला गेला. माहिती घरांमुळे नागरिकांची कामे वेगाने आणि झटपट होत असल्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी सांगतात. मात्र नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. संबंधित दाखला किंवा नकाशा केव्हा मिळेल हे कोणीच सांगत नाही. प्रत्येकवेळी दोन दिवसांनी सांगतो, असे मोघम उत्तर दिले जाते.
या दोन्ही ठिकाणी मुलीच कर्मचारी असल्यामुळे कितीही संताप आला तरी मुलींबरोबर भांडण्यात अर्थ नाही, असे म्हणून नागरिक निघून जातात. येथील मुलींना नेमक्‍या कामाची माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय ज्या कार्यालयाशी संबंधित काम आहे, अशा कार्यालयांशी समन्वयाचा अभाव असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. कदंब बस स्थानकावरील माहिती घरात तर या कर्मचाऱ्यांशी संवादही साधता येत नाही. याठिकाणी उघडझाप करणारी दारे बसवली आहेत. या कर्मचाऱ्यांना हवे असल्यास ते नागरिकांशी बोलतात पण नागरिकांना त्यांच्याशी बोलता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या माहिती घरात एकच कर्मचारी महिला असते. तिला एकटीलाच नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. येथील सर्व अर्ज कदंब बस स्थानकातील माहिती घरात जात असल्याने काहीवेळा नागरिकांना तिथे जाण्यास सांगण्यात येते. तिथे गेल्यानंतर अर्जाचे नेमके काय झाले याचे स्पष्ट उत्तरच दिले जात नाही.
दोन्ही माहिती घरात संपूर्ण उत्तर गोव्यातील सर्व तालुक्‍यातील लोक येतात. पेडणे, डिचोली किंवा सत्तरीतून येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारणे शक्‍य नसल्याने नागरिक फोन करतात. सह्या करण्यासाठी अधिकारी नाहीत, सर्व्हर बंद आहे, संबंधित लिपिक नाही, अशी जुजबी उत्तरे दिली जातात. अनेक नागरिक संताप व्यक्‍त करताना दिसतात मात्र मुलींशी वाद नको म्हणून परत जातात.
संबंधित खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून येथील कारभार सुरळीत आणि खऱ्या अर्थान गतीमान करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चांदण्याची अशी ती रात्र...!!

चांदण्याची अशी ती रात्र...!! 
वेळ रात्री साडेअकरा ते बाराची असावी. प्रवास गोवा ते कोल्हापूर. कोल्हापूरला निघण्यासाठी उशीरच झाला. नुकतीच अमावस्याही झाली होती. गोव्यातील उकाड्याने त्रस्त झालेला मी अंबोलीचा घाट लागताच थंडगार हवेने सुखावलो.... 
घाटमाथा जवळ आला होता. वाहनांची वर्दळही कमी होती. कीर्र.... अंधार... कुठेही उजेडाचा लवलेश नाही... माझ्या दुचाकीचाच काय तो उजेड. उगाचच आकाशात लक्ष गेले अन्‌ काय... मला मोह आवरला नाही. मी दुचाकी बाजूला घेतली आणि एका कठड्यावर मस्तपैकी बैठक मारली. गडद अंधारात चांदण्याचाच काय तो प्रकाश... किती मस्त अनुभव होता. चोहोबाजूला चांदण्या आणि चांदण्याच. एकटक पाहत बसलो असता त्या माझ्याजवळ आल्याचा भास झाला. त्याचवेळी व्ही. शांताराम यांच्या जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले गीत आठवले.... तारों मे सजके... अपने सूरज से... देखो धरती चली मिलने... किती सुंदर शब्द. किती सुंदर कल्पना.... 'जो ना देखे रवी वा देखे कवी' या म्हणीचा प्रत्यय आला.
चांदण्या रातीचा आनंदच काही और... शहरांतील झगमटात चांदण्यांचा आनंद घेण्याचे दिवस गेले. बऱ्याच वर्षांनी मी हा आनंद मनसोक्‍त घेतला. सोबत एखादा सखा किंवा मद्याचा प्याला असता तर आणखी मजा आली असती असे वाटले..... पण चांदण्यांच्या सहवासाने इतका बेधुंद झालो की... मद्याचा विचारच सर्रकन्‌ निघून गेला....

जरा विसावू या वळणावर ....

जरा विसावू या वळणावर .... 
भले बुरे जे घडून गेले... विसरून जाऊ सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर... या गाण्याच्या बोलाने आज सकाळी माझी झोपमोड झाली. अन्‌ वाटले... खरेच आयुष्यात आलेले अनुभव आणि आठवणी विसरण्यासारख्या असतात का? गीतकार सुधीर मोघे यांनी म्हटल्याप्रमाणे खरेच आपण कुठून येतो कळण्यापूर्वीच नकळत गुंतत जातो... हा गुंता सोडवता सोडवता आयुष्याची माध्यान्ह होते... आजच्या संगणकीय युगात तर सगळेच बनावट वाटावे असे... ट्विटर काय, फेसबूक काय अन्‌ वॉटस्‌अप काय.... सगळी नाती कामापुरती आणि गरजेपुरती. बऱ्याचदा समोर आल्यावरही ओळख नाही लागणार पण फेसबूकवर घट्ट मैत्री... तरीही आजची तरुणाई यात गुंतत चाललीय... का?, कशासाठी? माहीत नाही, पण असंच होतय हे मात्र खरं... आमचा गुंतण्याचा प्रश्‍न नाही... कारण आम्ही जपतो ती खरी आणि जीवंत नाती... सोशल नेटवर्क साईटवरची नव्हे... म्हणूनच जुन्या आठवणी आल्या की, आजच्या नाटकी नात्यांची चीड येते. असो... कधी ऊन तर कधी सावली... कधी चांदणे तर कधी काहिली... असे म्हणत आपणही सुधीर बाबुंप्रमाणे सारे गोड मानून घेऊ.. अन्‌ पुढे जाऊ...

'पोतिरा' ....!!

'पोतिरा' ....!! 
मातीच्या कच्च्या विटांच्या भिंतीचे घर. कौलारू छप्पर. मोठमोठ्या खोल्या. भिंतींची रुंदी किमान 3 ते 4 फूट. त्यातच खोदलेली कपाटे. प्रत्येक भिंतीत एक छोटी आणि मोठी देवळी. छोटी देवळी पत्र्याचा दिवा (आम्ही त्याचा चिमणी म्हणायचो) ठेवण्यासाठी. रॉकेलचा दिवा. त्याच सुतळी किंवा वळलेली कापडी वात. स्वयंपाक घर आणि पुढील मुख्य खोलीत दोन चिमण्या ठेवायच्या. इतर खोलीत एकच चिमणी. आठवड्यातून एकदा सगळ्या चिमण्या रॉकेलनी भरायच्या. माझ्या लहानपणी संपूर्ण गल्लीत दोन-चार घरातच विजेची व्यवस्था होती. पथदीपही 60 वॅटच्या बल्बचेच. ट्यूब लाईटही नव्हती. घराच्या भिंती पांढऱ्या मातीच्या. रंग नाही की, कोणतीही सजावट नाही. पण मस्त वाटायचे.
दिवसा विजेची गरज नसायची. मोठ्या खिडक्‍यांतून इतका उजेड यायचा की, विजेची गरजच वाटायची नाही. जमिनी आठवड्यातून एकदा शेणाने सारवायच्या. तर दिवाळीच्या काळात भिंती पांढऱ्या मातीने सारवायच्या. याला 'पोतिरा' म्हणत. मोठमोठ्या बादलीत पांढऱ्या मातीत पाणी घालून काला करायचा आणि एखाद्या कापडाने भिंती सारवायच्या. तरीही डासांची पैदास नाही की, किड्यांचा त्रास नाही. दुर्गंधीचा लवलेशही नसायचा. 'पोतिरा' देण्याचा कार्यक्रम आम्हा मुलांसाठी पर्वणी असायची. कारण दिवसभर मातीत खेळायला मिळायचे. उन्हाने तापलेल्या मातीत पाणी घातले की, मस्त सुगंध यायचा.... जो हल्लीच्या काळी दुर्मिळच म्हणावा लागेल....